पुणे – मुंबई- बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ झालेल्या गंभीर अपघातामध्ये कंटेनरला आग लागल्याने गिअर बॉक्स पूर्ण जळाला आहे. त्यामुळे त्याचे तांत्रिक विश्लेषण करताना अडचणी येत आहेत. परिणामी कंटेनरचा अपघात कशामुळे झाला, याबाबतचा प्रादेशिक परिवहन विभागाचा (आरटीओ) अहवाल येत्या दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. या अपघातात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याचे सांगण्यात आले. हा ट्रक राजस्थान पासिंगचा असून, आरटीओकडून याप्रकरणी पाहणी करून अहवाल बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र, अपघातातील आगीत कंटेनर, कार, ट्रकचा बराचसा भाग, तसेच गिअर बॉक्सही जळाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणास अडचणी येत असून, ते पूर्ण होताच आरटीओचा अहवाल समोर येईल. दरम्यान, वाहनांवर नजर ठेवण्यासाठी सध्या चोवीस तास वेगवेगळ्या ठिकाणी पथके तैनात केली आहेत. त्यामध्ये पुणे, सातारा आणि कोल्हापूर आरटीओची पथके आहेत. पुणे आरटीओकडून त्यांच्या हद्दीत एक अतिरिक्त पथक तैनात केले जाणार आहे. हे पथक कारवाईबरोबरच जड वाहनचालकांची जनजागृती करणार असल्याची माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली.