Navi sangvi : कोट्यवधींच्या रस्त्याला वर्षभरात तडे

पराग डिंगणकर
नवी सांगवी – सांगवी फाटा ते सांगवी पोलीस चौकी या केवळ ८०० मीटर अंतराच्या मुख्य रस्त्यासाठी सव्वा आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु या रस्त्याला अवघ्या एकाच वर्षात तडे गेले आहेत. तसेच चेंबरही खचले असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम गेल्या वर्षी मोठ्या धडाक्यात करण्यात आले. तब्बल ८ कोटी २५ लाख रुपये खर्च करून तयार झालेला हा रस्ता आज अवघ्या एका वर्षातच तडे जाऊन खचला आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिक संतप्त झाले आहेत. हा रस्ता सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर आणि पिंपरी चिंचवड या भागांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.
पुणे शहरातून येणाऱ्या वाहतुकीसाठी हा मुख्य रस्ता असल्याने दररोज हजारो वाहने याच मार्गावरून जातात. तसेच जिल्हा रुग्णालय, महाविद्यालय,शाळा या परिसरात असल्याने विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांचीही वर्दळ येथे कायम असते. अशा रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे काम केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण चार टप्प्यांत करण्यात आले. मार्च २०२४ ही काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांतच रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्या, तर काही ठिकाणी स्ट्रॉम वॉटर व ड्रेनेज चेंबर खचले. पदपथाचाही भाग तुटल्याने पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले आहे.रस्ता तयार होऊन वर्षभरही न झाल्याने पुन्हा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले, मात्र प्रश्न असा की – अजून किती वेळा या रस्त्याची डागडुजी करणार?
गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह
बारा मीटर रुंदीच्या या रस्त्यावर सिमेंटचे दोन मीटर गट्टू लावण्यात आले आहेत. हे गट्टू आता सैल होऊन तुटत आहेत.त्यामुळे मोटारसायकलस्वार आणि पादचारी अनेकदा अपघातग्रस्त होत आहेत. काही दिवसांपूर्वी तर एका तरुणीला या रस्त्यावरील अपघातात जीव गमवावा लागला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांविरोधात असंतोष निर्माण झाला होता.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, काम सुरू असताना अनेकदा दर्जा तपासणी न करता घाईघाईत काँक्रिट ओतले गेले. त्यामुळे रस्त्याच्या पृष्ठभागावर तडे गेले. “अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांचा रस्ता बनवून नागरिकांना धोक्यात ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली पाहिजे,” अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
सदर रस्त्याची पाहणी करून रस्त्याला गेलेले तडे व स्ट्रॉंम वॉटर, ड्रेनेज चेंबर खाली गेले असतील तर तातडीने त्याच ठेकेदाराकडून दुरुस्ती केली जाईल. – सतीश वाघमारे,कार्यकारी अभियंता स्थापत्य ‘ह’ प्रभाग
“कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्त्याची अशी दयनीय अवस्था पाहून त्रास होतो. दरवेळेस डागडुजी करून वेळ आणि पैसा वाया जातोय. प्रशासनाने दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई केली पाहिजे,” – महादेव नाईक स्थानिक नागरिक





