नवी दिल्ली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील महिन्यात 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याचवेळी नरेंद्र मोदी फिनटेक परिषदेलाही हजेरी लावतील, असेही त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहीसर येथील भारतीय विमानतळ प्राधीकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार करीत असलेले उपाय इत्यादींबाबत अतिशय सविस्तर चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी केली. फडणवीस म्हणाले, निश्चितच नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव दिलं गेलं पाहिजे, तसा प्रस्ताव आम्ही केला आहे आणि केंद्र सरकारची अनुकुलता आहे. त्यासंदर्भात जी काही प्रोसेस आहे, ती केंद्र सरकारमध्ये चालली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, नवी मुंबई विमानतळाला आम्ही दि. बा. पाटील यांचे नाव देऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, पनवेल ते उलवे दरम्यानच्या 1 हजार 100 हेक्टरवर ग्रीन फिल्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. या बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदींच्या हस्ते केले जाणार असल्याने त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. सैन्य दलाच्या विशेष विमानाने पंतप्रधान मोदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरतील. त्यानंतर ते विमानतळाचा संपूर्ण आढावा घेतील आणि एका विशेष कार्यक्रमात विमानतळाच्या उद्घाटनाची घोषणा करतील, अशी माहिती मिळत आहे.