प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे -सातारा महामार्गावरील जांभूळवाडी ते रावेत या ३२ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम त्वरेने पूर्ण झाल्यास नवले पुलावरील मृत्युच्या उतारास म्हणजेच जीवघेण्या अपघातांची मालिका संपुष्टात येऊ शकते. यामुळे आसपास राहणाऱ्या पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो. हा पूल उभारण्यास आॉगस्ट २०२५ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिली होती. तसेच या प्रकल्प अहवालात बदल करून पुन्हा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुधारित प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून त्यास मान्यता मिळाल्यानंतर तातडीने हे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.नवले पुलावरील तीव्र उतारामुळे सातत्याने अपघात होत असून त्यामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांच्या मनात धडकी बसली आहे. सततच्या अपघातांमुळे प्रदीर्घ लांबीचा उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीस जोर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) पुणे- सातारा महामार्गावरील (एनएच ४८) जीवघेणी अपघात मालिका आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गेल्या वर्षी या पर्यायी उड्डाणपुलावर विचार केला. त्यानुसार या उन्नत मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून अथवा बंगळुरूहून मुंबईकडे जाणारी वाहने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून जातात, ती सर्व वाहने या उड्डाणपुलावरून जातील, त्यामुळे या दोन्ही शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. प्रकल्पाची वैशिष्ट्ये – जांभूळवाडी- देहू रस्ता या ३२ किलोमीटर लांबीचा उन्नतपूल – प्रकल्पाचा एकूण खर्च सहा हजार कोटी – प्रकल्प दोन टप्प्यात होणार – पहिला टप्पा सुतारवाडी ते रावेत हा १५ लोमीटर लांबीचा – दुसरा टप्पा सुतारवाडी ते जांभूळवाडी १६ किलोमीटर लांबीचा – या उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक या महामार्गावरून सध्या क्षमतेपेक्षा अधिक वाहने धावत आहेत. त्यामुळे ४५ ते ६० मिनिटांचा जादा वेळ लागतो. तसेच वाहनांचा बहुतेक वेळा सरासरी वेग हा २० किमी प्रति तासापेक्षा कमी असतो. तसेच अपुरे सेवा रस्ते, पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या यामुळे स्थिती आणखी बिघडते. हा उड्डाणपुल झाल्यास वाहनाचा सरासरी वेग हा ८० किमी प्रतितास असा वाढेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ ३० ते ४० टक्क्याने कमी होईल, असे प्राधिकरणाने आपल्या अहवालात नमूद केले आहे.