प्रभात वृत्तसेवा पुणे – नवले पुल परिसरातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी जबाबदारी निश्चित करून एक आदर्श आराखडा तयार करावा. महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेसाठी, नवा रिंगरोड प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय यंत्रणेने तत्काळ राबवावयाच्या महत्त्वपूर्ण उपाययोजना घोषित कराव्यात, असे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. नवले पुल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांची दखल घेत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे विभागीय उपायुक्त तुषार ठोंबरे, पुणे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांचे वरिष्ठ अभियंते, वाहतूक पोलीस, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक अपघातांमध्ये वाहनांच्या वेगावरील अपुऱ्या नियंत्रणामुळे मोठी जीवितहानी झाल्याचे लक्षात घेऊन उपसभापतींनी उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आदेश दिले. यामध्ये सर्वप्रथम, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत स्पीड कमी करण्यासाठी सुसंगत रबर स्पीड ब्रेकर किंवा रंबल स्ट्रिप्स बसवण्यावर भर देता येईल. रस्ता ओला असताना वाहनांच्या घसरण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे हे स्ट्रिप्स संपूर्ण सुरक्षा मानकांनुसार बसवावेत, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली.वाहतूक कोंडीची परिस्थिती हाताळण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः जड वाहनांचे वेग नियंत्रण, ब्रेक कंडिशन, ओव्हरलोडिंग यावर नजर ठेवण्यासाठी हे केंद्र प्रभावी ठरतील, असे गोऱ्हे यांनी सांगितले. अपघातप्रवण परिसरात ध्वनिक्षेपक बसवून चालकांना सतत वेग, उतार, पावसाळी परिस्थिती आणि ट्रॅफिक अपडेटची माहिती देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, तसेच उपाययोजनेत जवळच फायर ब्रिगेडची सुविधा उपलब्ध ठेवणे, रेस्क्यू टीम तैनात करणे, अपघातानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये मदत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्याचे निर्देश दिले. याशिवाय ट्रक मालक असोसिएशनची बैठक घेऊन ड्रायव्हर ट्रेनिंग, उतारावरील गतीनियंत्रण, वाहनांची नियमित तपासणी अशा मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही गोऱ्हे यांनी दिल्या.