प्रभात वृत्तसेवा पुणे – नवले पुलावर होणारे अपघात रोखण्यासाठी आता चेकपोस्ट उभारणे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसह वाहन चालकांची ड्रिंक अँड ड्राईव्हची तपासणी करावी. वाहन चालकाने वाहने न्यूट्रल करून चालवू नये यासाठी त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. खेड शिवापूर येथे चेक पोस्ट उभारण्यात येणार असून प्रादेशिक परिवहन विभागाकडे या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. नवले पुलावरील अपघात कमी करण्याबाबत पुणे महापालिकेत महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापालिका, पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत अपघात रोखण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय प्रस्तावित करण्यात आले असून, त्यानुसार, प्रत्येक विभागास जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यात, चेकपोस्टची जबाबदारी प्रादेशिक परिवहन विभागाकडे देण्यात आली आहे. असे आहे विभाजन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण -जांभूळवाडी ते नवले उड्डाणपूल या दरम्यान सूचना फलक लावणे. -प्रत्येक १०० मीटरवर फलक लावणे -जांभूळवाडी बोगदा ते स्वामीनारायण मंदिर मोठ्या आकाराचे एलईडी सूचनाफलक लावणे. -या रस्त्यावर १५ एम. एम. जाडी पर्यंतचे थर्मोप्लास्ट राजमार्ग प्राधिकरण रम्ब्लर पेंट मारणे. -वडगाव पुलालगतची पाटबंधारे विभागाच्या जागेतून राष्ट्रीय महामार्गावर प्रवेश द्यावा. -वारजे पुलाचे बांधकाम पूर्ण करून मार्च २०२६ अखेर पूर्ण करावे. -आवश्यकतेनुसार नवीन भुयारी मार्ग उभारावे. -जड वाहनांच्या वाहतुकीसाठी रस्त्याच्या कडेला स्वतंत्र मार्गिका राखीव ठेवणे. -वेग मर्यादा ६० वरून ४० कि.मी. प्रतितास करणे. -नवले पुलालगत अपघात मदत कक्ष स्थापन करणे पोलीस वाहतूक विभाग भूमकर भुयारी मार्ग ते नवले पूल यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा तसेच वडगाव सेवा रस्त्याच्या दुतर्फा थांबणाऱ्या रिक्षा, ट्रॅव्हल्स बसेस, ट्रक ई. वाहनांवर दैनंदिन कारवाई करावी. जड वाहनांना कमी रहदारीच्या कालावधीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रवेश देण्याबाबत विचार करण्यात यावा. स्पीडगनची संख्या वाढवून कारवाई वाढविणे.