प्रभात वृत्तसेवा पुणे – काही दिवसांपूर्वी नवले पुलाजवळ झालेला अपघात कंटेनरचा वेग जास्त असल्यामुळे झाल्याचे पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) प्राथमिक तपासणीतून दिसून आले. अतिवेगामुळे कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची शक्यता असून, हा अपघात मानवी चुकीमुळे झाल्याचे दिसते. अंतिम अहवाल आरटीओकडून तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. नवले पुलाजवळील अपघातात कंटेनर, कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामध्ये कार व कंटेनर आगीमध्ये जळून खाक झाले. या अपघाताची तांत्रिक तपासणी प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र, कंटेनरचा गिअर बॉक्स जळाल्यामुळे हा अपघात कसा झाला हे शोधण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांनी तांत्रिक व महामार्गावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून माहिती गोळा केली. त्यावेळी कंटेनरचा वेग जास्त होता. नवले पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे आढळले. कंटेनर चालकाने गाडी न्यूट्रल केल्याची शक्यता असून, हा अपघात मानवी चुकामुळेच झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते. “पुणे आरटीओकडून सातारा ते पुणे दरम्यान वाहनांची तपासणी करण्यासाठी एक पथक वाढविले आहे. आता दोन पथकांमध्ये १० अधिकारी वाहनांची तपासणी करतील. एक पथक फिरते असून, दुसरे पथक टोल नाका परिसरात वाहनांची तपासणी करेल. त्यामध्ये प्रामुख्याने जड वाहनांवरील चालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली जाईल.” -अर्चना गायकवाड – प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे