नगर -जिल्ह्यास बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. घराची भिंत अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. तसेच 23 जनावरे मरण पावली आहेत. कच्च्या व पक्क्या 764 घरांची पडझड झाली, तर 23 झोपड्यांसह 632.3 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. निसर्गचा सर्वाधिक फटका संगमनेर, पारनेर, कोपरगाव व अकोले या चार तालुक्यांना बसला आहे. यात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र कमी दबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी जिल्ह्यात चांगलीच दणादणा उडली. या चक्रीवादळाचा काही परिणाम जिल्ह्यात होणार नाही, असे सांगण्यात येत होते. परंतु सायंकाळी चक्रीवादळ मुंबई सोडून नाशिककडे सरकल्यानंतर त्यांचे पडसाद नगर जिल्ह्यात उमटले. या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा पारनेर, कोपरगाव, संगमनेर व अकोले या चार तालुक्यांना बसला. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने अनेक घरांचे पत्रे उडाले. काही घरांच्या भिंती कोसळल्या, विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली. तसेच फळबागांसह पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. कोपरगाव, अकोले, संगमनेर या तालुक्यांना चक्रीवादळाचा फटका बसू शकतो, या शक्यतेने स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेतली होती. परंतु वादळी वाऱ्यापुढे निभाव लागला नाही. या निसर्ग चक्रीवादळाची तातडीने जिल्हा प्रशासनाने प्राथमिक माहिती घेतली असून, त्यात अकोलेत एकाच भिंत पडून मृत्यू झाला, तर नगर, संगमनेर तालुक्यात प्रत्येकी एक, तर शेवगाव तालुक्यात दोन जण जखमी झाले आहेत. तर 23 जनावरे दगावली. त्यात अकोलेत 4, संगमनेरमध्ये 7, राहाता 3, श्रीरामपूर 2, पारनेर 5, तर नेवासे व कोपरगावमध्ये प्रत्येकी एक जनावर दगावले आहे. या चक्रीवादळात तब्बल 764 घरांची पडझड झाली आहे. त्यात कच्ची 30 घर पूर्णपणे पडली, तर 708 घरांची पडझड झाली आहे. पक्की 4 घर पूर्णपणे पडली, तर 22 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. तालुकानिहाय घरांच्या पडझडीची संख्या पुढीलप्रमाणे आहे. नगर – 3, अकोले- 53, कर्जत- 4, कोपरगाव- 22, नेवासे- 12, पारनेर- 44, पाथर्डी- 10, राहुरी-32, संगमनेर- 547, शेवगाव- 1, श्रीगोंदा- 13, श्रीरामपूर- 18, राहाता- 6. चक्रीवादळ व जोरदार पाऊस झाल्याने 632.3 हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात पारनेर तालुक्यात सर्वाधिक 540 हेक्टरचा समावेश आहे, तर कोपरगाव-3.4, नेवासे- 2.5, पाथर्डी- 76, श्रीगोंदा- 9.5, श्रीरामपूर-0.8 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.