प्रभात वृत्तसेवा माथेरान – रायगड जिल्ह्यातील एकमेव थंड हवामानाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानकडे राज्यभरातून पर्यटक आकर्षित होतात. निसर्गाने भरभरून दिलेल्या या गावाला असामान्य भौगोलिक स्थान, मिनी ट्रेनची ऐतिहासिक ओळख आणि प्रदूषणमुक्त परिसर असतानाही गावाचा विकास मात्र अडकून पडलेला आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे स्थानिक राजकारण आणि श्रेयवाद.माथेरानची सध्याची परिस्थिती पाहता, “एक गाव बारा भानगडी” ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. इतक्या छोट्या गावातही राजकीय कुरघोडी, श्रेयासाठी चढाओढ, स्थानिकांच्या हक्कांची पायमल्ली दिवसेंदिवस ठळकपणे दिसून येत आहे. गावात कोणतंही काम झालं तरी ‘कोणत्या पक्षाच्या काळात झालं’ याचा गजर करण्यातच नेत्यांची स्पर्धा लागलेली आहे. गावाची समस्या, जनता, पर्यावरण, पर्यटन, गरिबी, शिक्षण, आरोग्य या सर्व बाबी केवळ गप्पांपुरत्याच राहिल्या आहेत.या सगळ्या गोंधळात अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित राहिली आहेत. सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे डागडुजीकरण, कचऱ्याची विल्हेवाट, स्थानिक आरोग्य सेवा, पर्यटकांसाठी सुविधा वाढविणे, मुलभूत शिक्षण पायाभूत सुविधा पूर्णपणे दुर्लक्षित झाल्या आहेत. गावाला मिळालेल्या संधींचे राजकारणात रुपांतर.. माथेरानसारख्या ठिकाणी स्थानिकांचे रोजगार पर्यटनावर अवलंबून आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात, यामधून हॉटेल, फेरीवाले, हातगाडीवाले, घोडेवाले, दुकानदार यांचे अर्थचक्र फिरते. मात्र हीच संधी स्थानिकांपेक्षा बाहेरच्यांनी अधिक प्रमाणात हस्तगत केलेली आहे. स्थानिक राजकारण्यांनीच त्यांच्या राजकीय फायद्यासाठी बाहेरून आलेल्या लोकांना थेट आधार दिला असून, मतदार यादीत त्यांची नावे घालून त्यांना राजकीय हत्यार बनवले आहे. आज ज्यांचे या गावाशी कोणतेही नातं नाही, त्यांनाच गावात मुळ स्थानिकाचा दर्जा देऊन वापरले जात आहे. त्यामुळे भविष्यात स्थानिक युवक, पारंपरिक व्यवसाय करणारे कुटुंब, पिढ्यानपिढ्या इथे राहणाऱ्या नागरिकांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. स्थानिकांमध्ये वाढती गटबाजी.. गावातील युवक, ज्येष्ठ नागरिक, सेवाभावी संस्था वारंवार या गोष्टींकडे लक्ष वेधत आहेत. अनेक वेळा बैठका घेऊन ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला, पण गावातली फुटलेली मते, गटबाजी आणि प्रत्येकाने आपापलं वर्चस्व अबाधित ठेवण्याची मानसिकता यामुळे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. गावाच्या नावाने हक्क सांगणारे मात्र विकासकामांना विरोध करत असून, जिथे फक्त गावासाठी विचार व्हायला हवा, तिथे पक्ष, गट, जात, पैसा या गोष्टी प्रमुख ठरत आहेत. समस्यांचा डोंगर आणि सुटकेचा मार्ग.. माथेरानमध्ये अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामे, कचऱ्याचा वाढता डोंगर, पाण्याचा तुटवडा, जंगलात वाढती वस्ती आणि अनधिकृत पर्यटन मार्ग या साऱ्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. स्थानिक प्रशासनाकडे निधी असूनही इच्छाशक्तीचा मात्र अभाव जाणवतो. यातून बाहेर पडण्यासाठी आता तरी गावातील सुज्ञ, ध्येयवादी, शिक्षित आणि सक्रिय नागरिकांनी एकत्र येऊन गावासाठी विकास आधी, श्रेय नंतर या भूमिकेवर ठाम असणे गरजेचे आहे. राजकारणात सज्जन लोकांना आणणे, सामाजिक संस्थाचे बळ वाढवणे, स्थानिकांना प्राधान्य देणं आणि पर्यावरणाचा समतोल राखणे या चार गोष्टींचा गाभा धरूनच माथेरानचा खरा विकास साधता येईल.