“राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांवर “विश्वास’ नाही” – शरद बुट्टे पाटील

भाजपचा एकही कार्यकर्ता राष्ट्रवादीत गेला नाही
तालुक्याच्या नेतृत्वाने स्वत:चे हसे करून घेऊ नये
आंबेठाण – कोरेगाव बुद्रुकमधील भाजपाचा एकही साधा कार्यकर्ता देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेलेला नाही. राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी अतिशय पोरकटपणाने आणि उतावळेपणाने केलेला हा प्रकार आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पुन्हा राष्ट्रवादी प्रवेश करून घेणे म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यांवर यांचा विश्वास नाही हे सिद्ध होते. किमान तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या नादी लागून स्वतःचे हसे करून घेऊ नये, अशी रोखठोक भूमिका भाजपाचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नाव न घेता मांडली.
पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक वराळे मंगळवारी (दि. 11) तालुका अध्यक्ष शांताराम भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी बुट्टे पाटील बोलत होते. भाजपा तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, माजी सभापती चांगदेव शिवेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय रौंधळ, तालुका उपाध्यक्ष सुनील देवकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष काळूराम पिंजण, दत्तात्रय मांडेकर, रोहित डावरे, शिवाजी डावरे, देविदास बांदल, रामदास खेंगले यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
शरद बुट्टे पाटील म्हणाले की, म्हणाले अडीच वर्षे सत्ता नसताना आमची अनेक मोठी कामे रखडली परंतु आम्ही स्वार्थ किंवा फायदा साधण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना एकही पत्र दिले नाही भेटलो सुधा नाही. मागील सरकारने आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले हे गुन्हे मागे घेण्यासाठी आम्ही आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत, असे त्यांनी नमूद केले.
…तर जशास तसे उत्तर
एक जिल्हा परिषद आपल्यापेक्षा जास्त विकास कामे करतो याचे शल्य कायम खेड तालुक्याच्या नेतृत्वाला आहे, त्यामुळेच ते काही ना काही कारणाने या जिल्हा परिषद गटात गावोगावी गट तट, वादविवाद वाढवण्यासाठी खतपाणी घालत असतात. त्यातूनच असले खोटे प्रकार होत आहेत अशी टीका बुट्टे पाटलांनी केली. आम्ही कुणाच्या वादात न पडता विकास कामे करत आहोत. पण आमचेवर चुकीची टीका केली तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही बुट्टे पाटील यांनी यावेळी सांगितले.





