Telangana: तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात एका सरकारी एकात्मिक शाळेच्या (Integrated School) बांधकामासाठी जागा मोकळी करण्याच्या नावाखाली ८०० वर्ष जुने, काकतीय काळातील शिवमंदिर बुलडोझर लावून पाडण्यात आले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि इतिहासकारांनी या प्रकरणी प्रशासनाकडून उत्तर मागितले आहे. काय आहे प्रकरण? (Telangana) वारंगल जिल्ह्यातील खानापूर मंडळातील अशोक नगर येथे हे प्राचीन मंदिर होते. १३ व्या शतकातील काकतीय राजा ‘गणपती देव’ यांच्या कारकिर्दीतील हा ऐतिहासिक वारसा होता. विशेष म्हणजे, या ठिकाणी १२३१ इसवी मधील सात ओळींचा दुर्मिळ तेलुगू शिलालेख होता, ज्यामध्ये राजाचा उल्लेख ‘महाराजा’ आणि ‘राजाधिराजुलु’ असा करण्यात आला होता. १९६५ मध्येच वारसा विभागाने या मंदिराची अधिकृत नोंद केली होती. (Telangana) हेही वाचा – इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; 3 पर्यटकांचा होरपळून मृत्यू कायदेशीर कारवाईची मागणी – ऐतिहासिक ‘कोटा कट्टा’ मातीच्या किल्ल्याच्या परिसरात हे मंदिर वसलेले होते. पुरातत्व विभागाची कोणतीही परवानगी न घेता हे मंदिर पाडल्याबद्दल तेलंगणा वारसा कायदा (कलम ३०) अंतर्गत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. रामा राव इमानेनी यांनी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे तक्रार केल्यानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. (Telangana) प्रशासनाचा बचावात्मक पवित्रा – जनतेचा वाढता रोष पाहून जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. ३० एकर जागेवर पसरलेल्या झाडाझुडपांची स्वच्छता करताना केवळ एका जुन्या पडक्या वास्तूचे अवशेष आढळले, असा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच ही वास्तू ‘संरक्षित स्मारक’ म्हणून नोंदवलेली नव्हती, असेही सांगण्यात आले. मंदिर पुनर्बांधणीचे आश्वासन – परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून वारंगलच्या जिल्हाधिकारी डॉ. सत्य शारदा आणि आमदार डोंथी माधव रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट दिली. झालेल्या चुकीची दखल घेत त्यांनी त्याच ठिकाणी मंदिराची पूर्णपणे पुनर्बांधणी करण्याचे आश्वासन दिले आहे. इतिहासकार, पारंपारिक वास्तुविशारद आणि पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर पुन्हा उभारले जाणार असून, या जागेला आता औपचारिकरीत्या संरक्षित घोषित करण्यात येणार आहे.