पुणे – महाराष्ट्राच्या युवा टेबल टेनिस खेळाडूंना कॅडेट, ज्युनिअर व सब-ज्युनिअर गटात चमकदार कामगिरी करत युटीटी राष्ट्रीय रॅंकिंग टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत (उत्तर विभाग) चार पदकांची कमाई केली.
सोनपत येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ध्रुव शाह (कॅडेट मुले), स्वस्तिका घोष (ज्युनिअर मुली), तनिशा कोटेचा (सब-ज्युनिअर मुली) यांनी प्रत्येकी रौप्यपदकाची कमाई केली तर, मुलींच्या कॅडेट गटात जेनिफर व्हर्गीसने कांस्यपदक मिळवले. महाराष्ट्राच्या खेळाडूंपैकी तिघांनी अंतिम फेरी गाठली.
मुलींच्या ज्युनिअर गटातील अंतिम सामन्यात दुस-या मानांकित स्वस्तिकाला अव्वल मानांकित मध्यप्रदेशच्या अनुषा कुटुंबलेकडून 2-4 असे पराभूत व्हावे लागले. मुलींच्या सब-ज्युनिअर गटात हरयाणाच्या सुहाना सैनीने महाराष्ट्राच्या तनिशाला 4-1 असे नमविले. तनिशाने चांगली सुरुवात केली पण, नंतर सुहानाने पुनरागमन करत विजय मिळवला.
मुलांच्या कॅडेट गटातील अंतिम सामन्यात तमिळनाडूच्या उमेश कुमारने ध्रुव शाहला 4-1 असे नमविले तर, पश्चिम बंगालच्या दिया ब्रम्हाचारीने मुलींच्या कॅडेट गटात नंदिनी सहाला 4-2 असे पराभूत केले.उमेशने ध्रुवविरुद्ध 3-0 अशी आघाडी घेतली. महाराष्ट्राच्या खेळाडूने चौथी गेम जिंकली. पण, त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलींच्या कॅडेट गटात व्हर्गीसला चुरशीच्या लढतीत पश्चिम बंगालच्या नंदीनी सहाकडून 2-3 असे नमविल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले