पिंपरी | आजपासून बालेवाडीत विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

पिंपरी, (प्रतिनिधी) – अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४५ व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती व टेबल टेनिस क्रीडास्पर्धा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहेत. बुधवारपासून (दि. २९) ते शुक्रवापर्यंत (दि. ३१) होणाऱया या स्पर्धेत गुजरात,
मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेशातील तसेच इतर खासगी अशा १४ वीज कंपन्यांचे २१ संघ व सुमारे ३५० खेळाडू सहभागी होणार आहेत. कुस्तीसाठी ६ संघांमध्ये तसेच कबड्डी व टेबल टेनिसच्या अजिंक्यपदासाठी प्रत्येकी १२ संघांमध्ये लढत होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. २९) सकाळी ९.३० वाजता राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या मुख्य उपस्थितीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी राज्याचे क्रीडा आयुक्त राजेश देशमुख, एमएसईबी होल्डींग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य अभियंता राजेंद्र पवार (महावितरण) आणि विविध समितीचे प्रमुख व सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.





