प्रज्वल रेवन्नांनी 1 महिन्यांनी मौन सोडलं: ‘माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचलं गेलं, मी 31 मे रोजी SITला संपूर्ण सत्य सांगेन’

Prajwal Revanna: कर्नाटकातील हसन मतदारसंघातील जेडीएसचे लोकसभा खासदार प्रज्वल रेवन्ना लैंगिक छळ प्रकरणी 31 मे रोजी विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) हजर होणार आहेत. देश सोडल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर, खासदार प्रज्वल रेवन्ना म्हणाले की, ते एसआयटीच्या तपासात सहकार्य करण्यास तयार आहेत आणि 31 मे रोजी त्यांच्यावरील खटल्यांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर हजर होतील.
एक व्हिडिओ जारी करताना प्रज्वल म्हणाले की, मी स्वत: शुक्रवार, 31 मे रोजी सकाळी 10 वाजता एसआयटीसमोर हजर राहीन आणि तपासात सहकार्य करेन. माझ्यावरील सर्व आरोपांना मी उत्तर देईन. माझा न्यायालयावर विश्वास आहे.
प्रज्वल रेवन्ना म्हणाले की, 26 एप्रिलला निवडणुका झाल्या तेव्हा माझ्याविरुद्ध कोणताही खटला नव्हता किंवा कोणतीही एसआयटी स्थापन झाली नव्हती. माझा परदेश दौरा आधीच ठरलेला होता. मी परदेश दौऱ्यावर असताना मला आरोपांची माहिती मिळाली. राहुल गांधी आणि इतर अनेक काँग्रेस नेते सत्य जाणून न घेता माझ्याविरोधात बोलू लागले. माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले. मी शुक्रवार 31 मे रोजी सकाळी 10 वाजता एसआयटीसमोर हजर राहून तपासाशी संबंधित सर्व माहिती देईन. तपासाला माझा पाठिंबा असेल. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.
#WATCH | In a self-made video, JDS MP Prajwal Revanna says, “I will appear before SIT on 31 May.”
He said, “…When elections were held on 26th April, there was no case against me and no SIT was formed, my foreign trip was pre-planned. I came to know about the allegations while… pic.twitter.com/7Rt5b0Opi4
— ANI (@ANI) May 27, 2024
प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि हसन लोकसभा मतदारसंघातील एनडीएचे उमेदवार आहेत. प्रज्वलवर अनेक महिलांसोबत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप आहेत.
हसनमध्ये मतदान केल्यानंतर 27 एप्रिल रोजी प्रज्वल जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) मार्फत एसआयटीने विनंती केल्यानंतर इंटरपोलने ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी केली होती.
एसआयटीने दाखल केलेल्या अर्जानंतर निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने 18 मे रोजी प्रज्वल रेवन्ना विरुद्ध अटक वॉरंट जारी केले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची विनंती केंद्राकडे केली आहे. दरम्यान, आता प्रज्वल रेवन्ना एसआयीटीसमोर हजर राहून काय उत्तर देणार, तपासात काय समोर येईल पहावे लागणार आहे.





