National Lok Adalat – साताऱ्यात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये संपूर्ण जिल्हयात एकूण १६ हजार ६४५ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी प्रलंबित प्रकरणे १ हजार २८५ तडजोडीने निकाली निघाली. त्यामध्ये एकूण रु. १६ कोटा ८८ लाख ३१ हजार ९६६ रुपयांची वसुली करण्यात आली. विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ९ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश अरविंद वाघमारे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. सर्व पॅनेल प्रमुख, न्यायिक अधिकारी व सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते. लोकअदालतीत वादपूर्व १३ हजार ८८१ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी तडजोडीने १२३ प्रकरणे निकाली निघाली. वादपूर्व प्रकरणामध्ये एकूण रु. ९८लाख३२ हजार २१६ एवढी रक्कम वसूल करण्यात आली. लोकअदालतीमध्ये एकूण १ हजार ४०८ प्रकरणे निकाली निघाली. दि. ०४/०५/२०२६ ते ०८/०५/२०२६ या कालावधीमधील स्पेशल ड्राईव्ह मध्ये सातारा जिल्हयामध्ये एकूण ५८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वैवाहिक वाद, तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी केसेस, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कर्ज, धनादेश न वठल्याची प्रकरणे इत्यादींचा समावेश आहे. वादपूर्व प्रकरणात फायनान्स कंपन्या, बँकांची कर्ज, दूरध्वनी व विद्युत देयके आणि ग्रामपंचायत, मालमत्ता पाणीपट्टी कर वसुली प्रकरणे इ. प्रकरणांचा समावेश होता. जिल्हयाचे ठिकाणी एकूण ९ आणि तालुका न्यायालयात एकूण २८ पॅनेल करण्यात आले होते. पॅनेल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश क. स्तर, यांनी काम पाहिले. प्रत्येक पॅनलवर एक विधिज्ञ पॅनल सदस्य म्हणून काम पाहत होते. लोक अदालत यशस्वी करण्यासाठी पक्षकार, विधिज्ञ, सर्व न्यायीक अधिकारी, पोलीस, विधी स्वयंसेवक आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात आणखी प्रबोधन आणि प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश नीना बेदरकर यांनी सांगितले.