JK Election Result: भाजपच्या अनेक मुस्लिम उमेदवारांचे “डिपॉझिट जप्त’, एका उमेदवाराला फक्त 479 मते

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल (JK Election Result 2024) जाहीर होत आहेत. विधानसभेच्या 90 पैकी 84 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, एनसीने 39 जागा जिंकल्या आहेत, तर त्यांचे उमेदवार तीन जागांवर आघाडीवर आहेत. भाजपने 27 जागा जिंकल्या आहे, तर पक्ष दोन जागांवर आघाडीवर आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले होते. मात्र, भाजपच्या एकाही मुस्लिम उमेदवाराला विजय मिळाला नाही. सर्व मुस्लिम उमेदवारांची कामगिरी खराब राहिली आहे.
भाजपच्या मुस्लिम उमेदवारांची स्थिती –
पंपोर – भाजपने सय्यद शौकत गायूर अंद्राबी यांना तिकीट दिले होते. ते वाईटरित्या हरले आहेत. शौकत आठव्या क्रमांकावर राहिले. त्यांना केवळ 957 मते मिळाली.
राजपोरा – अर्शीद भट्ट येथे तिसरे राहिले. त्यांना एकूण 5584 मते मिळाली आहेत. येथे एनसीचे गुलाम मोही विजयी झाले आहेत.
शोपियान – जावेद अहमद कादरी यांचाही पराभव झाला आहे. त्यांचा अपक्ष उमेदवार शबीर अहमद यांनी पराभव केला.
अनंतनाग पश्चिम – मोहम्मद रफिक वाणी तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना ६५७४ मते मिळाली. येथे एनसीचे अब्दुल मजीद विजयी झाले आहेत.
अनंतनाग – सय्यद वजाहत सातव्या क्रमांकावर राहिले. त्यांना केवळ 1508 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार पीरजादा मोहम्मद सय्यद विजयी झाले आहेत.
श्रीगुफ्वारा-बिजबेहारा – सोफी युसूफ यांचा एनसीचे उमेदवार बशीर अहमद यांच्याकडून पराभव झाला आहे. त्यांना 3716 मते मिळाली.
इंदरवाल – तारिक हुसेन यांना 9550 मते मिळाली आहेत. त्यांचा अपक्ष उमेदवाराकडून पराभव झाला.
ईदगाह – या जागेवर आरिफ राजा यांची खराब कामगिरी झाली. त्यांना केवळ 479 मते मिळाली.
याशिवाय बनिहालमधून सलीम भट्ट, लाल चौकातून एजाज हुसेन, खानसाहिब अली जागेवरून मोहम्मद मीर डॉ. अली मीर, चरार-ए-शरीफ मतदारसंघातून जाहिद हुसेन, सोनवारी अब्दुल रशीद खान, बांदीपोरामधून नसीर अहमद लोन हे निवडणूकीत पराभूत झाले आहेत.

