पणजी (म्हापसा) :- जुगराज सिंगच्या हॅट्ट्रिकच्या बळावर महाराष्ट्र कर्नाटकला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण अखेरच्या सहा मिनिटांत कर्नाटकने तीन गोल नोंदवल्यामुळे युवराज वाल्मीकीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचे हे स्वप्न भंगले. कर्नाटकने ५-४ असा रोमहर्षक विजय मिळवला. आता महाराष्ट्राचा संघ बुधवारी उत्तर प्रदेशशी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कांस्यपदकाची लढत खेळणार आहे.
पेड्डीम क्रीडा संकुलाच्या मैदानावर चालू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात जुगराजने दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत महाराष्ट्राचे खाते उघडले. त्यामुळे पहिल्या सत्रात महाराष्ट्राकडे १-० अशी आघाडी होती. २८व्या मिनिटाला चंदना अल्याना निक्कीनने मैदानी गोल करीत मध्यंतराला कर्नाटकला १-१ अशी बरोबरी साधून दिली. तिसऱ्या सत्रात जुगराजने ३२व्या आणि ३३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन लागोपाठ गोल करीत हॅट्ट्रिक साकारली.
सामन्यात ३८व्या मिनिटाला शिशा गौडा बीएमने पेनल्टी कॉर्नरच्या सहाय्याने कर्नाटकचा दुसरा गोल झळकावला. पण ४०व्या मिनिटाला वेंकटेश केंचेच्या गोलमुळे महाराष्ट्राकडे ४-२ अशी आघाडी होती. पण अखेरचे सत्र अपेक्षाभंग करणारे ठरले.
शिशाने ५५व्या आणि ५७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन सलग गोल करीत आपली हॅट्ट्रिक साकारली आणि कर्नाटकला बरोबरीही साधून दिली. ५९व्या मिनिटाला अभरान सुदेव बी. याने नोंदवलेला मैदानी गोल कर्नाटकसाठी निर्णायक ठरला. याच गोलने महाराष्ट्राच्या अंतिम फेरी गाठण्याच्या वाटचालीपुढे पूर्णविराम दिला.