नवी दिल्ली : देशभरातील ग्राहकांसाठी ‘नॅशनल कंज्युमर हेल्पलाइन’ (NCH) एक मोठा आधार ठरत आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ८ महिन्यांत या हेल्पलाइनच्या माध्यमातून ग्राहकांना ४५ कोटी रुपयांहून अधिकचा परतावा (Refund) मिळवून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही सर्व प्रकरणे न्यायालयात जाण्यापूर्वीच (प्री-लिटिगेशन स्टेज) सोडवण्यात आली आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, २५ एप्रिल ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत नॅशनल कंज्युमर हेल्पलाइनने ३१ वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित ६७,२६५ तक्रारींचे यशस्वी निवारण केले. या सर्व तक्रारी रिफंडशी संबंधित होत्या. यामध्ये प्रामुख्याने ई-कॉमर्स, ट्रॅव्हल आणि टेलिकॉम क्षेत्रातील तक्रारींचा समावेश होता. रिफंड मिळवून देण्याच्या बाबतीत ई-कॉमर्स क्षेत्र आघाडीवर आहे. ई-कॉमर्स: ३९,९६५ तक्रारींमधून सुमारे ३२ कोटी रुपयांचा परतावा मिळवून दिला. ट्रॅव्हल आणि टुरिझम: ४,०५० तक्रारींमधून ३.५ कोटी रुपयांचा परतावा मिळाला. हेल्पलाइनची व्याप्ती आता केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नसून, दुर्गम भागातील ग्राहकही याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. तक्रार निवारणाची काही उदाहरणे: जोधपूरमध्ये एका ग्राहकाला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खराब खुर्च्या मिळाल्या होत्या. पाच वेळा पिकअप कॅन्सल होऊनही तोडगा निघाला नव्हता, मात्र हेल्पलाइनच्या हस्तक्षेपानंतर पूर्ण पैसे परत मिळाले. बेंगळुरूमध्ये इंटरनेट कनेक्शनसाठी पैसे भरूनही ४ महिने सेवा मिळाली नव्हती. हेल्पलाइनमुळे ग्राहकाला त्वरित रिफंड मिळाला. चेन्नईत विमान तिकीट रद्द करूनही परतावा मिळत नसलेल्या प्रवाशाला हेल्पलाइनमुळे न्याय मिळाला. अशी करा तक्रार – जर तुमचीही ग्राहक म्हणून फसवणूक झाली असेल, तर तुम्ही खालील मार्गांनी आपली तक्रार नोंदवू शकता. १. टोल-फ्री क्रमांक: १९१५ या क्रमांकावर कॉल करा. २. ऑनलाइन पोर्टल: INGRAM पोर्टलला भेट द्या. ३. इतर पर्याय: ‘उमंग’ (UMANG) ॲपच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येईल. विनाखर्च आणि जलद न्याय सरकारच्या मते, कंपन्या आणि संस्थांची वाढती जबाबदारी आणि ‘कन्व्हर्जन्स पार्टनर्स’च्या वाढत्या संख्येमुळे तक्रारींचे निवारण वेगाने होत आहे. यामुळे ग्राहकांना लांबलचक कायदेशीर प्रक्रियेत न अडकता जलद, स्वस्त आणि विश्वासार्ह न्याय मिळत आहे.