Nasrapur Case – नसरापूर येथील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेले निर्घृण अत्याचार व हत्ये प्रकरणाचा तातडीने निकाल लावण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार आणि उच्च न्यायालयाच्या परवानगीने फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्ट स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये विशेष तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. दरम्यान, आरोपीला फाशीची शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करून तीची निर्घृण हत्या केल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. घटना घडल्यानंतर पीडितेच्या कुटुंबाच्या मागणीनुसार मी स्वतः सरकारतर्फे पत्र पाठवून आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात येईल, असे सांगितले. पीडित कुटुंबाच्या सदस्यांसोबत जिल्हा प्रशासन म्हणून मी तसेच पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक सतत संपर्कात आहेत. आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार तसेच प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यानुसार विशेष फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्ट स्थापन करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. या न्यायालयात उच्च विधिज्ञ आणि कायदे तज्ज्ञ यांची नियुक्ती करण्यात येत आहे. लवकरच पोलिसांकडूनही आरोप पत्र दाखल करण्यात येईल. त्यानुसार तातडीने न्यायालयीन प्रक्रिया सुरू करून आरोपीला कठोर फाशीचीच शिक्षा होईल, असे सरकार तसेच प्रशासनाचे प्रयत्न आहेत, असे डुडी यांनी नमूद केले.