Nasrapur Case Protest – नसरापूर अत्याचार प्रकरणी वीर बाजी पासलकर पूल ते नवले पुलादरम्यान शनिवारी झालेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेली कोंडी फुटत नसल्याने पाच तासांनंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. लाठीमाराच्या घटनेचा नागरिकांनी निषेध केला आहे. ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष (पुणे) आनंद दवे म्हणाले, पोलिसांशी चर्चा सुरु असताना शेवटच्या दहा मिनिटांत लाठीमार केला. जमाव हिंसक झाला नव्हता, तसेच कोणतीही अनुचित घटना घडली नव्हती. यामुळे लाठीमार करण्याची गरज नव्हती. नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अन्यथा जमावाच्या ताब्यात द्या, या मागणीसाठी शनिवारी सायंकाळी नागरिकांनी चार तास रस्ता रोखून आपल्या भावना व्यक्त केल्या. चिमुकलीचा मृतदेह असलेल्या रुग्णवाहिकेसमोर तिचे आई-वडील आणि नागरिकांनी ठिय्या दिला. घटनास्थळी पिडीतेचे आई-वडिल, नातेवाईक ,नसरापूरचे ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांनी तब्बल पाच तास महामार्ग अडवून धरला. घटनास्थळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार दाखल झाल्यावर त्यांनी पालकांशी संवाद साधला. यानंतर पालक रुग्णवाहिकेतून मृतदेह वैकुंठ येथे अत्यसंस्कारासाठी घेऊन गेले. यानंतरही नागरिकांनी महामार्ग खुला केला नाही. दुसरीकडे वाहनचालक पाच तास महामार्गावर अडकले होते. वाहनांच्या रांगा बालेवाडपर्यंत लागल्या होत्या. अनेकांसोबत लाहन मुले, ज्येष्ठ नागरिक होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसानी साडे दहाच्या सुमारास लाठीमार करुन नागरिकांना महामार्गावरुन हटवले. नसरापूर पीडितेच्या नातेवाईक आणि संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करीत नवले ब्रिज बंद केला. अश्रृ अनावर अनेकांनी लाठ्या खाल्ल्या. तुम्ही मारा, तुम्हाला संवेदना आहेत की नाही, असा प्रतिप्रश्न नागरिकांनी केला. अनेकांना अश्रृ अनावर झाले होते. लाठ्या खाल्ल्यानंतरही ते हटायला तयार नव्हते. रस्ता खुला करण्यासाठी पोलिसांसमोर दुसरा पर्याय नव्हता. दुसरीकडे पोलिसांवर समाजमाध्यमातून लाठीमाराबद्दल टीका करण्यात आली. यामध्ये काही राजकीय नेत्यांचाही समावेश होता. पिडीतेची ओळख उघड नातेवाईक, परिचितांपैकी काहींनी समाजमाध्यमावर पिडीतेची ओळख उघड केली. त्यांनी पिडीतेचे छायाचित्र, नाव टाकून श्रध्दांजली वाहिली. तसेच प्रशासन आणि राजकीय नेत्यांवर निशाला साधला. यातून मात्र पिडीतेची ओळख उघड झाली. आंदोलकांना समजावण्यासाठी एकही बडा लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता. शहरात मंत्री,खासदार आणि आमदार यापैकी एकही आंदोलनस्थळी फिरकला नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पिडीतेच्या घरी भेट दिली. तेव्हा नागरिकांच्या भावना तीव्र होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावून पिडीतेच्या नातेवाईकांशी संवाद साधून दिला. मात्र त्यावर कोणाचेही समाधान झाले नाही. यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी नागरिक मुख्यमंत्र्यांना बोलवा, अशी मागणी करत होते.