Nasrapur Case Protest – नसरापूर प्रकरणातील बालिका सिंहगड रस्ता परिसरात राहणारी आहे. यामुळे नागरिक, कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी सायंकाळी नवले पुल परिसरात मोठे आंदोलन केले. आरोपीला शिक्षा करण्याची तसेच मुख्यमंत्र्यांनी येऊन आश्वासन देण्याची आंदोलकांनी मागणी केली. यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. हे आंदोलन सायंकाळी पाचच्या सुमारास सुरु झाले. ते रात्री साडे आठपर्यंत सुरुच होते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल झाल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता. मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका नातेवाईकांनी रस्त्यात आडवी लावली. नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पोलिसांनी सामंजस्याची भुमिका घेतली होती. मात्र अंत्यसंस्कार वेळेत होणे आवश्यक होते. यासाठी पोलीस नातेवाईक आणि आंदोलकांना विनवणी करत होते. नसरापूर पीडितेच्या नातेवाईक आणि संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करीत नवले ब्रिज बंद केला. यासाठी घटनास्थळी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे , उपायुक्त संभाजी कदम सिंहगड नऱ्हे व इतर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बालिकेचा मृतदेह अत्यंसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात येणार होता. मात्र आंदोलनामुळे मृतदेह वैकुंठला आणण्यास दोन ते अडीच तास उशीर झाला. पोलिसांनी आंदोलकांना पांगवत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान वैकुंठ स्मशानभूमीतही मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता. वाहनांच्या रांगा कार्यालये सुटण्याच्या वेळेसच रास्ता रोको करण्यात आला होता. यामुळे पुणे -मुंबई महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नागरिकांना तासन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. पुलावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले होते. राजकीय पक्षाचा कोणताही बडा नेता रात्री उशीरापर्यंत घटनास्थळी दाखल झाला नव्हता. पोलीस उपायुक्त (वाहतूक) हिंम्मत जाधव यांनी रस्ता रोको आंदोलन विचारात घेता नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले होते. आंदोलनामुळे साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गिका पुर्णपणे बंद केल्याचे सांगितले. यामुळे वडगाव पुलाकडे येण्याचे टाळून सुरक्षित ठिकाणी थांबून रहावे, तसेच पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी केले.