नाशिक | कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत तपासणी मोहीम सुरूच ठेवावी : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक – कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरीदेखील शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना टेस्टिंग आणि तपासणी मोहीम सुरूच ठेवावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला, निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती उपाययोजना व विकास कामांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. मात्र अद्यापही आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना व कोरोना तपासणी नियमित सुरू ठेवावी. कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत उपाययोजना कायम सुरू ठेवाव्यात.
तसेच रुग्ण संख्या कमी झाली म्हणून गाफील राहू नये अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांटला तातडीने स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावे असे आदेश दिले.
यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नपा गटनेते प्रवीण बनकर, येवल्याचे प्रांत अधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपअभियंता उन्मेष पाटील, जनार्दन फुलारी, तालुका पोलीस निरिक्षक अनिल भवारी, येवला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.





