नाशिक – नाशिक शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा बांगलादेशी नागरिक असलेल्या महीलांना अटक केली आहे. या महिलांना प्रसिद्ध पांडवलेणी गुंफांजवळील कवठेकरवाडी येथून अटक करण्यात आली. तसेच, भारतात बेकायदेशीर वास्तव्यासाठी त्यांना मदत करणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. कवठेकरवाडी येथे काही बांगलादेशी महिला बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून २५ ते ४१ वयोगटातील या सहा महिलांना ताब्यात घेतले. पोलिसांना या महिलांच्या मोबाईलमध्ये बांगलादेशी राष्ट्रीय ओळखपत्रे आणि बनावट आधार व पॅन कार्ड सापडली आहेत. बॉबी आणि लकी उर्फ लियाकत हमीद कुरेशी या नाशिकचे रहिवासी असलेल्या दोन व्यक्तींनी या महिलांना नाशिकमध्ये राहण्यास मदत केली होती. त्यापैकी लियाकत हमीद कुरेशी याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.