Nashik News : कांद्याने केला वांदा ! दर कोसळल्याने शेतक-यांसमोर मोठे संकट

नाशिक : बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळल्याने शेतक-यांसमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे ठाकले आहे. कांद्याच्या निम्न दरामुळे शेतक-यांचा पुन्हा एकदा वांदा झाला आहे. नाशिक जिल्हा कांद्याची बाजारपेठ म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. नाशिकमधील लासलगाव कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणा-या लासलगावसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहे.
कांद्याचे सरासरी बाजार भाव आठशे ते एक हजार रुपयांपर्यंत खाली कोसळले आहे. वाढत्या उन्हामुळे शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी खराब होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. यंदा उन्हाळी कांद्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसला आहे. तसेच यंदा कांद्याचे दर कोसळले आहे.
एप्रिल महिन्यात पडलेल्या उन्हामुळे शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची प्रतवारी खराब होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता कांदा उत्पादक शेतकरी आपला कांद्याची प्रतवारी करुन साठवणूक करत आहेत. तसेच ज्यावेळेस कांद्याच्या बाजारभावात वाढ होईल, त्यावेळेस हा साठवणूक केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी आणला जाईल असे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहे.
मागील आठवडाभरातील राज्यात कांद्याची आवक २ लाख ३७ क्विंटल झाली होती. यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक १ लाख ४४ हजार क्विंटलची आवक झाली. या आठवड्यात उन्हाळी कांद्याला कमीत कमी ८४० रुपये तर जास्तीत जास्त १२५० रुपये दर होता. अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसला आहे. तसेच यंदा कांद्याचे दर कोसळले असून सरासरी ८०० ते १००० रुपये क्विंटल दराने कांदा विकल्या जात आहे. एप्रिल महिन्यात पडलेल्या उन्हामुळे शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची प्रतवारी खराब झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे.





