Nashik News : त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस; गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या २४ तासांत शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. तसेच नाशिकमध्ये चोवीस तासात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
गोदा घाटावरील गांधी तलाव, रामकुंड परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागले आहे. शहर व उपनगरातील पावसाचे पाणी गोदावरीत येत असल्याने नदीला पूरजन्य स्थिती येऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. बुधवारी (दि.१८) रात्रीपासूनच परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू असून, त्याचा परिणाम नाशिक शहरातील गोदावरीच्या मुख्य प्रवाहावर दिसून येत आहे.
नदीच्या काठावरील रहिवाशांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी महापालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने सूचना फलकही लावले आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने रस्त्यांना ओढा नाल्याचे स्वरुप प्राप्त झाल्याचे पहायला मिळाले. कुशावर्त आणि त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. सलग तीन दिवसांपासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पाऊस सुरु आहे.





