Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६६ किलोमीटरच्या रिंगरोडला मंजूरीच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ परिक्रमा मार्ग बाह्य रिंगरोडला चालना मिळाली असून ६६ किलोमीटरच्या रिंगरोडच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. या मार्गासाठी ७ हजार ९२२.११ कोटी रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या मार्गामुळे कुंभमेळ्यात येणार्या भाविकांना सुविधा तर निर्माण होतीलच शिवाय नाशिकचे दळणवळणही सुनियोजीत होण्यास मदत होणार आहे. नाशिकच्या विकासासाठी रिंग रोड मैलाचा दगड ठरणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे २५ हजार कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात कुंभमेळ्याच्या साडेपाच हजार कोटी रूपयांच्या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराबाहेरून परिक्रमा मार्ग बाह्य रिंगरोड व्हावा याकरीता दादा भुसे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना सदरचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानूसार तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रिंगरोडचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळला एमएसआरडीसी सादर केला होता. एमएसआरडीसीने प्रकल्प सर्वेक्षणासाठी पुणे स्थित मोनार्क या सल्लागार संस्थेमार्फत सर्वेक्षण करून अहवाल सादर केला होता. परंतू दोन वर्षांपासून हा अहवाल धुळखात पडून होता. अखेर मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला चालना दिली असून आता हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या मार्गाला सिंहस्थ परिक्रमा मार्ग असे नाव देण्यात आले आहे.