Nashik Leopard News : नाशिकमधील मानव-बिबट्या संघर्ष रोखण्यासह बिबट्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पूर्व आणि पश्चिम वनविभागाने एकत्रित १६ कोटी रुपयांचा नवा आराखडा सादर केला आहे. या आराखड्यात रॅपिड रेस्क्यू टीम (आरआरटी), रेस्क्यू वाहने, पिंजरे यांसह विविध बाबींचा समावेश आहे. हा निधी वनविभागाला आपत्ती व्यवस्थापनांतर्गत अपेक्षित असून प्राथमिकदृष्ट्या पहिल्याच बैठकीत पिंजऱ्यांसाठी ५० लाख तर चार आरआरटीसाठी चार वाहने मंजूर करण्यात आली आहेत. बिबट्यांवर नियंत्रणासाठी मागील आठवड्यात वनमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्या बैठकीतील सूचनांनंतर वनविभागाने नाशिक जिल्ह्यासाठी १५ कोटी ८१ लाख १५ हजार २०० रुपयांचा आराखडा तयार केला. या आराखड्यातील तातडीची बाब म्हणून जिल्हा प्रशासनाने पिंजऱ्यांसाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला असून चार रॅपिड रेस्क्यू टीमसाठी (आरआरटी) चार वाहनेही मंजूर करण्यात आली आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. नागरी भागातील बिबट्याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याच्या उपायांचा त्यात समावेश नाही. बिबट्यांच्या ट्रान्झिट सेंटरला मान्यता दिला असली तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी वन्यजीव संरक्षण विभागाच्या मान्यतेनंतरच होऊ शकणार आहे. या ट्रान्झिट सेंटरची क्षमता साधारणतः अनुसूची एकमध्ये मोडणाऱ्या ४० हिंस्र प्राण्यांसाठी असणार आहे.