नाशिक : पुण्याहून मालेगावला निघालेल्या खासगी ट्रव्हल्सला नाशिकमध्ये भीषण अपघात झाला. पहाटे ३ वाजताच्या सुमारास ट्रव्हल्स आणि पिकअपची जोरात धडक झाली. या अपघातामध्ये ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू, तर २० जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. नाशिकच्या मालेगाव-मनमाड महामार्गावर पहाटे तीनच्या सुमारास व-हाणे गावाजवळ भीषण अपघात झाला. पुण्याकडून मालेगावकडे येणारी खासगी ट्रॅव्हल बस आणि पिकअप यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात चार जण ठार झाले आहे, तर २२ जण जखमी झाले आहेत. त्यामधील २ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात ठार झालेले सर्व चार जण हे मालेगाव येथिल रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर ट्रव्हल्समधील प्रवाशांमध्ये किंचाळ्या अन् आरडओरड ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगेतलं. अपघात इतका भयंकर होता की पहाटे गावात दूरपर्यंत आवाज आला होता. त्यानंतर काही स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. सर्व जखमींना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वाहनात अडकलेल्या सर्वांना पोलीस व स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.