वॉशिंग्टन, – गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाबाहेर केली गेलेली तिसरी अंतराळ भ्रमंती “नासा’च्या दोन अंतराळवीरांनी पूर्ण केली आहे. नासाचे अंतराळवीर केट रुबिन्स आणि व्हिक्टर ग्लोव्हर यांनी 7 तास 4 मिनिटांनी या अंतराळयात्रेची सांगता केली.
आगामी काळातील सौर ऍरे श्रेणी सुधारणेसाठी आवश्यक असलेले सुधारित किट बसविण्यासाठी नासाच्या दोन अंतराळवीरांनी सोमवारी काम सुरू केले होते. या दोघांनी स्पेस स्टेशनच्या डाव्या बाजूला असलेल्या सौर ऍरेच्या सर्वात दूरच्या “पी 6′ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेटजवळ काम केले.
ग्लोव्हरने ब्रॅकेटची रचना तयार केली आणि हे ब्रॅकेट “पी 6′ सौर ऍरेपैकी एक असलेल्या 2 बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सपोर्ट स्ट्रटसला जोडण्यासाठी रुबिन्स यांनी त्यांच्या बरोबर काम केले. यावेळी या दोघांनाही काही यांत्रिक उपकरणांची अंतराळात हाताळणी करावी लागली. त्यानंतर सोलर ऍरे जोडीतील “4 बी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन्य एका पॉईंटजवळही या दोघांना असेच काम करावे लागले. या दोघांना हार्डवेअर उपकरणांची जुळवाजुळवही अंतराळात करावी लागली. त्यांचे हे काम 5 मार्चला होणाऱ्या पुढील स्पेस वॉकच्यावेळी पूर्ण होणार आहे. अंतराळ यानातून बाहेर पडून अंतराळ स्थानकातील दुरुस्ती करण्याच्या या कामाबद्दल नासाच्या तज्ञांमध्ये कमालिचे औत्सुक्य होते.