#व्यक्‍तिदर्शन: अवकाश वेडी सुनीता विल्यम्स

19 सप्टेंबर 1965ला अमेरिकेतील ओहायो स्टेटमधील युक्‍लिड येथे सुनिताचा जन्म झाला. तिचे बालपण नीडहॅममध्ये गेले. सुनिताचे वडील दीपक पंड्या हे प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत. ते भारतीय असून गुजरात राज्यातले आहेत. तिची आई बोनी स्लोव्होनियाची असून अमेरिकेत स्थायिक झालेली आहे. सुनिता जन्मानेच अमेरिकन नागरिक आहे. तिचे शालेय शिक्षण नीडहॅम येथे झाले.

नीडहॅममधील शालेय शिक्षणानंतर तिने अमेरिकेच्या नॅव्हल ऍकॅडमीतून “फिजिकल सायन्स’ विषयात पदवी मिळवली. 1995 मध्ये फ्लोरिडा इस्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधून एम.एस. झाल्यावर 1998 मध्ये तिची नासा या संस्थेत ऍस्ट्रोनट प्रशिक्षणासाठी निवड झाली. या अंतराळाकडे झेपावणाऱ्या कार्यक्षेत्राची सुरुवात नॅव्हलस्टेट ऍकॅडमीतच सुरू झाली होती. 1987 मे मध्ये तिला कमिशन मिळाले, तर 1989 मध्ये नॅव्हल ऍव्हेगेटर म्हणून संधी उपलब्ध झाली. हेलिकॉप्टर कॅबंट स्कॉट्रानमधून तिच्या कामास चालना मिळाली. तेथील प्रशिक्षणानंतर ती व्हर्जिनिया येथे नियमित सेवेत रुजू झाली. मध्य व लाल समुद्रासह पर्शियन आकातात मदतकार्य करणाऱ्या संघात ती होती. 1992 च्या “हेरिकेन’ या झंझावाती वादळात तिने झंझावाती मदतकार्य केले. 1993 ला तिची नॅव्हल टेस्ट पायलट प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली आणि नंतर स्क्वॉड्रन सेफ्टी ऑफिसर म्हणून नेमणूक झाली. येथेच ती विमान विद्येत पारंगत झाली. अंतराळयात्रेची पाळेमुळे याचमुळे रुजली.

पुस्तकी ज्ञानातून मिळालेल्या उच्च पदव्यांनी उच्चविद्याविभूषित असणे हा अंतराळयात्रेचा निकष नक्कीच नाही. अंतराळ प्रवासाकरिता ज्यांची निवड केली जाते त्यांना आधी खूप खडतर परिश्रम करावे लागतात. अंतराळयात्रींचे प्रशिक्षण अतिशय कठोर, कठीण असते. तांत्रिक शिक्षण हा त्याचा पाया असला तरी शारीरिक, मानसिकदृष्ट्या स्वस्थ असणे येथे फार महत्त्वाचे आहे. अंतराळ मोहिमेत चुकीला क्षमा नाही आणि चूक दुरुस्त करण्यास येथे संधीही मिळत नाही. म्हणूनच अचूक काम करणाऱ्यांच्या गटात प्रथम स्वतःला सिद्ध करावे लागते. यात समुद्र, घनदाट जंगल, दूरवर पसरलेले वाळवंट आणि निर्भीड, निर्मनुष्य प्रदेशातल्या संकटांवर मात करण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. क्षणात अचूक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करण्यावर भर द्यावा लागतो. पन्नास फूट खोलवर असलेल्या पाण्यातील मोड्युलच्या प्रतिकृतीत सुनीताने दहा दिवसांचा काळ व्यतीत केला हेच उदाहरण प्रशिक्षण कसे असते हे कळण्यास मदत करते.

अंतराळात भ्रमण करण्यापूर्वी तिला 270 तास विमान चालवण्याचा अनुभव आहे. एकूण 30 प्रकारची विमाने तिने चालवली. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये रशियाचाही सहभाग आहे. म्हणून तेथील कार्यपद्धत जाणून घेण्यास सुनीताचे वास्तव्य तेथेही होते. तेथून परत आल्यावर तिने रोबोट स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.