पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ गुरुवार (दि. ३) पासून होत आहे. या दिवसापासून ते १२ अॉक्टोबरपर्यंत धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती आणि त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त आणि उत्सवप्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अमिता अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. गुरुवारी सकाळी ०८:०० वाजता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तसेच, सायंकाळी ०६:०० वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते होईल. याशिवाय दहा दिवसांत श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होतील. याशिवाय ढोल-ताशा वादनसेवा, पुणे मनपा महिला कर्मचारी सन्मान, नामांकित कंपन्यांमधील महिला एचआर यांचा सन्मान, महिला न्यायाधिशांचा सत्कार, लेखिका-कवयित्री सन्मान, पुणे मनपा स्वच्छता कर्मचारी सत्कार, कन्यापूजन, विविध शाळांतील शिक्षकांद्वारे भोंडला, वीरमाता-वीरपत्नी सन्मान, नारी तू नारायणी सन्मान सोहळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. भाविकांचा ५ कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून, मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटिव्ही कॅमेरे आणि २५ हून अधिक सुरक्षारक्षक असणार आहेत. सोन्याची साडी यंदाचे वैशिष्ट्य… सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शिव-पार्वती विवाह सोहळा, कथकली नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाट्य आणि पोवाडा सादरीकरण, सामूहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम हे यंदाचे वैशिष्ट्य असणार आहे. दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. शुक्रवार (दि. ४) – पहाटे ०५:०० – महिलांचे सामुहिक श्रीसूक्त पठण सायं. ०५:०० – पुणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान रात्री ०८:३० – शिव-पार्वती विवाह सोहळा नाट्यरूप शनिवार (दि. ५) – सायं. ५ – महिला एचआर यांच्या हस्ते आरती रविवार (दि. ६) – सायं. ०५: ०० – महिला न्यायाधिशांचा सन्मान रात्री ०८.३० – वी आणि श्रीकृष्णावर आधारित कथकली नृत्य सोमवार (दि. ७) – – दु. ०४:०० – मनपा महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते आरती – सायं.०५.३० साहित्य क्षेत्रातील लेखिका, कवयित्री यांच्या हस्ते आरती मंगळवार (दि.८) – सायं. ०५:०० – वंचित विशेष घटकातील मुलींचे कन्यापूजन – रात्री ०८:३० – छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाट्य आणि पोवाडा बुधवार (दि.९) – सायं. ०५:०० – शाळांतील शिक्षकांचा भोंडला गुरूवार (दि.१०) – सायं.०५:०० – जवानांच्या वीरमाता आणि वीरपत्नी आणि महिला लष्करी अधिकाऱ्यांच्या सन्मान शुक्रवार (दि.११) – विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा गौरव – रात्री ०८:३० – सामूहिक गरबा – रात्री ०९:३० – समाजातील महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक रावण दहन