नाशिक : राज्यात अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला, खर्रा-मावा यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी आता कठोर पावले उचलली जाणार आहेत. या अवैध व्यवसायातील मुख्य सूत्रधारांवर आणि गुटखा कंपनीच्या मालकांवर थेट ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतला आहे. मंत्रालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुटखा विक्रीचे रॅकेट परराज्यातूनही जोमात सुरू असून, त्यात काही शासकीय अधिकारीही सामील असल्याचे उघड झाले आहे. “या रॅकेटमध्ये जे शासकीय अधिकारी सहभागी आहेत, त्यांना मी अजिबात सोडणार नाही. त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा मंत्री झिरवाळ यांनी दिला. बनावट सुपारी ते केमिकलयुक्त गुटखा अवैध गुटखा निर्मितीत माणसे जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाला सुपारीचा आकार देऊन त्याला रंग व केमिकल लावून सुगंधित केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव त्यांनी समोर आणले. “हा केवळ अवैध व्यवसाय नाही, तर तरुण पिढी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारा गंभीर गुन्हा आहे. गुटख्यामुळे नपुसंकत्वासारख्या भयानक समस्या निर्माण होत आहेत,” असेही झिरवाळ यांनी नमूद केले. काय करण्यात येणार कारवाई? – अवैध गुटखा उत्पादक-विक्रेते आणि मुख्य सूत्रधारांवर मोक्का लावला जाईल – दोषी शासकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व विभागीय कारवाई – जिल्हास्तरावर पोलिस, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त मोहिमा राबवणार – जनजागृतीसाठी व्यापक मोहीम राबवली जाणार “गुटखाबंदी केवळ कागदावर राहणार नाही. आता प्रत्यक्ष कडक अंमलबजावणी होईल,” असा निर्धार नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील अवैध गुटखा माफियांमध्ये घबराट पसरली असून, पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कारवाया होण्याची शक्यता आहे.