मुंबई : जे लोक कधीच विमानात बसले नाहीत, त्यांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले, असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम सध्या सुरू असून यावर म्हस्के यांनी असे विधान केले आहे. त्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागणार आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाची एक टीमही तिथे पोहोचली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही काश्मीरमध्ये गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली आहे. परंतु, याच्या बढाया नरेश म्हस्के यांनी मारल्या आहेत. पत्रकारांशी बोलताना म्हस्के म्हणाले, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आमचे पथक काश्मीरला पाठवले. एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कोल्हापूर, केरळ, इशाळवाडी या ठिकाणी एकनाथ शिंदे सर्वात आधी पोहोचून मदत करत होते. सरकार तर मदत करत आहे. जे लोक कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले आहे. यांना कधी श्रेय घ्यायचे याचे भान नाही- वडेट्टीवार नरेश म्हस्के यांच्या या विधानावर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ही वेळ काय, कोणी कधी कसले श्रेय घ्यायचे याचे भान राहिले नाही का? पर्यटकांना सुखरूप आणणे महत्वाचे की विमान प्रवास? आणि ते केले म्हणून पण श्रेय घ्यायचे? पहलगाममध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झाला, काही जखमी झाले, काही अडकले आहे. त्यांना धीर देण्यापेक्षा सगळ्यात आधी तिथे कोण पोहोचत आहे याची स्पर्धा चालली आहे. महायुती सरकारमधील मंत्री, खासदार सगळ्यांनी जबाबदारीचे भान सोडले आहे! किमान अशा घटनांमध्ये तरी स्वतःचे मार्केटिंग करणे सोडा, असेही ते म्हणाले.