मुंबईतील घरावर ईडीचा छापा
नवी दिल्ली : जेट एअरवेजचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल हे ईडीच्या कचाट्यात अडकले आहेत. कारण त्यांच्या मुंबईतील घरावर ईडीने छापा टाकला. एका ट्रॅव्हल कंपनीद्वारे दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालाच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. संबंधिक कंपनीने गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांच्यावर 46 कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याव्यतिरिक्त परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत त्यांचा जबाबही नोंदवला आहे.
Mumbai: Enforcement Directorate (ED) raid is underway at the residence of former Chairman of Jet Airways, Naresh Goyal in connection with an alleged money laundering case. pic.twitter.com/0rFmo9B3Th
— ANI (@ANI) March 5, 2020
यापूर्वी गोयल यांच्या मुंबई आणि दिल्लीमधील एकूण 12 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते. परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत हे छापे टाकण्यात आले होते. 2014 मध्ये करण्यात आलेल्या या गुंतणुकीदरम्यान एफडीआयच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात आले होते.
तसेच गोयल यांच्या परदेश दौऱ्यांवरही बंदी घालण्यात आली होती. परंतु त्यानंतर न्यायालयानं त्यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली होती. 1992 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जेट एअरवेजच्या बोर्डावरुन नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने गेल्या वर्षी मार्च महिन्यात राजीनामा दिला होता. नरेश गोयल चेअरमन पदावरुनही पायउतार झाले होते. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या चौकशी अहवालात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार असल्याचे आढळले होते. 17 एप्रिल रोजी जेट एअरवेज पूर्णपणे ठप्प पडली.