नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार; NDAच्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब

नवी दिल्ली – राजधानी नवी दिल्लीत आज झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. मोदी हेच देशाचे पुढील पंतप्रधान होणार आहेत हे त्यामुळे स्पष्ट झाले.
काल म्हणजे मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून एनडीएला सगळ्यांत जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे हीच आघाडी सत्तेवर येणार हे स्वच्छ असताना कालपासून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या काही विधानांमुळे ही आघाडीही सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली करत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे नक्की कोणत्या आघाडीचे सरकार येणार, आणि त्या आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार, एनडीएचे उमेदवार मोदीच असतील की अन्य कोणी असा बराच सस्पेन्स निर्माण झाला होता. त्याला आता बहुतेक पूर्णविराम मिळाला आहे.
आज झालेल्या बैठकीत १६ पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. बैठकीत एक प्रस्तावही संमत करण्यात आला. त्यात असे म्हटले आहे की भारतातील १४० कोटी नागरिकांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक क्षेत्रात देशाचा झालेला विकास पाहिला आहे. गेल्या दहा वर्षातील मोदी सरकारची जनकल्याणाची धोरणेही सगळ्यांनी पाहिली आहेत. प्रदीर्घ काळानंतर म्हणजे जवळपास सहा दशकांनंतर भारतातील जनतेने तिसऱ्यांदा पूर्ण बहुमत असलेले सशक्त सरकार निवडले आहे.
मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने लोकसभेची निवडणूक लढण्यात आली व त्यात विजय मिळाल्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आम्ही सगळे नेते एकमताने मोदी यांची आघाडीचे नेते म्हणून निवड करतो. एनडीए सरकार भारतातील गरिब, महिला, युवावर्ग, शेतकरी, शोषित- वंचित आणि पीडितांची सेवा करण्यासाठी कटिबध्द आहे. भारताच्या वारशाच्या संरक्षण करत देशाच्या सर्वांगिण विकासासाठी आणि प्रत्येक व्यक्तीच्या जिवनमानात सुधारणा करण्यासाठी हे सरकार कार्यरत राहील.
यांचा आहे एनडीएत समावेश:
१. भाजप- २४
२. तेलगु देसम- १६
३. संयुक्त जनता दल- १२
४. शिवसेना- ७
५. राष्ट्रवादी कॉंग्रेस- १
६. लोकजनशक्ती (रामविलास)- ५
७. जनता दल (धर्मनिरपेक्ष)- २
८. राष्ट्रीय लोकदल- २
९. जनसेना पार्टी- २
१०. यूपीपीएल- १
११. हिंदुस्तानी आवाम मोर्चा- १
१२. जोरम पीपल्स मूव्हमेंट- १
१३. सिक्किम क्रांतीकारी मोर्चा-१
१४. अपना दल- १
१५. आसाम गण परिषद- १
१६. आसू पार्टी- १
आम्ही एनडीएचे घटक आहोत ; बैठकीनंतर चंद्राबाबु नायडूंची पहिली प्रतिक्रिया
आम्ही एनडीएचे घटक आहोत आणि आजची बैठक चांगली झाली अशी प्रतिक्रिया तेलगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबु नायडू यांनी बैठक संपल्यानंतर बोलताना दिली. बैठकीत काय निर्णय घेण्यात आले याबाबत नंतर सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बैठक झाल्यानंतर नायडून तातडीने भारतीय जनता पार्टीचे नेते पीयूष गोयल यांच्या घरी रवाना झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोयल यांच्या घरी एनडीए सरकारमध्ये तेलगु देसम पक्षाला किती मंत्रिपदे दिली जातील आणि खाती कोणती असतील याबाबत चर्चा झाल्याचे समजते. अर्थात त्याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, आजच्या बैठकीत नायडू याना देण्यात आलेले विशेष महत्व लपून राहीले नाही. मोदी यांच्या शेजारच्या आसनावरच त्यांना बसवण्यात आले होते. त्यावेळी मोदी यांना पाठिंबा देण्याचे पत्रही त्यांनी सोपवले. पत्र देण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठीच ते आले होते.
जागा घटूनही शिंदेंची ताकद वाढली
एकनाथ शिंदे यांची शिवसेना महाराष्ट्रात १५ जागांवर लढली व त्यातील ७ जागांवर त्यांना विजय मिळाला. १३ जागांवर त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी थेट सामना झाला. त्यातील सहा जागांवर शिंदेसेनेची सरशी झाली. ठाकरेंना मिळालेल्या जागा पाहता आणि फुटीच्या अगोदर जेवढे खासदार होते त्यांची संख्या पाहता शिंदे याची ताकद कमी झाली असे कोणी म्हणू शकतो.
मात्र भारतीय जनता पार्टीलाच स्पष्ट जनादेश नसल्यामुळे एनडीएतला प्रत्येक घटक पक्ष त्यांच्यासाठी महत्वाचा आहे व त्या घटक पक्षाचा प्रत्येक खासदारही महत्वाचा ठरला आहे. त्यामुळे एकप्रकार नायडू, नितीश यांच्यानंतर अधिक जागा असणाऱ्या शिंदे यांची ताकद वाढलीच आहे. केंद्रातील नव्या सरकारमध्ये त्यांना किती मंत्रिपदे अथवा अन्य काय मिळेल हा नंतरचा भाग. तथापि, शिंदेंच्या शब्दाला जे अगोदरच्या सरकारमध्ये नव्हते त्यापेक्षा जास्त वजन आता नक्कीच असेल.





