नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (३ जानेवारी) नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात भगवान बुद्धांच्या पवित्र पिपराहवा अवशेषांचे भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. द लाइट अँड द लोटस : रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन असे या प्रदर्शनाचे शीर्षक असून, यात शतकाहून अधिक कालावधीनंतर परत आणलेले पिपराहवा अवशेष प्रथमच राष्ट्रीय संग्रहालय (नवी दिल्ली) आणि भारतीय संग्रहालय (कोलकाता) येथील मूळ अवशेषांसह एकत्र प्रदर्शित केले जाणार आहेत. १८९८ मध्ये उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील पिपराहवा येथे सापडलेले हे अवशेष भगवान बुद्धांच्या अस्थींशी थेट संबंधित मानले जातात. पुरातत्त्वीय पुराव्यानुसार, पिपराहवा हे प्राचीन कपिलवस्तूचे ठिकाण आहे, जिथे भगवान बुद्धांनी संन्यास घेण्यापूर्वी बालपण आणि तरुणपण व्यतीत केले. हे अवशेष प्रारंभिक बौद्ध धर्माच्या अभ्यासाचे महत्वाचे साधन मानले जातात. या प्रदर्शनात सांची स्तूपाच्या प्रेरणेने तयार केलेले पुनर्रचित मॉडेल केंद्रस्थानी असेल. याशिवाय पिपराहवा रिव्हिजिटेड, बुद्धांच्या जीवनातील प्रसंग, बौद्ध शिक्षणांचे सौंदर्यशास्त्र, बौद्ध कला आणि आदर्शांचा सीमापार विस्तार तसेच सांस्कृतिक वारसा परत आणण्याचा सततचा प्रयत्न असे विविध विभाग असतील.प्रदर्शन अधिक आकर्षक आणि समजण्याजोगे व्हावे यासाठी इमर्सिव्ह चित्रपट, डिजिटल पुनर्रचना, प्रोजेक्शन आणि मल्टिमीडिया सादरीकरणे यांचा समावेश करण्यात आला आहे.