Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या ब्राझीलमधील अधिकृत दौऱ्याला प्रारंभ; अध्यक्ष लुला यांच्याशी होणार द्विपक्षीय चर्चा

ब्रासिलिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्राधीलच्या दौऱ्याला आजपासून प्रारंभ झाला. ब्राझिलियातील अल्व्होराडा पॅलेसमध्ये मंगळवारी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी आणि त्यांच्या पत्नींनी मोदींचे समारंभपूर्वक स्वागत केले. १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रिओ दि जानेरो येथे आलेले पंतप्रधान मोदी काल रात्री ब्राझीलच्या राजधानीत पोहोचले. ब्राझीलियामध्ये आगमन झाल्यावर, विमानतळावर बटाला मुंडो बँडने पारंपारिक ब्राझिलियन सांबा रेगे सादरीकरणाने मोदींचे स्वागत केले.
या बँडचे संगीत हे आफ्रो-ब्राझिलियन तालवादनाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक स्तरावरील प्रयत्न आहे, अशा शब्दात मोदींनी या वाद्यवृंदाचे कौतुक केले. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या भारतीय डायस्पोराच्या सदस्यांनीही त्यांचे स्वागत केले. लुला दा सिल्वा पंतप्रधानांच्या सन्मानार्थ दुपारी भोजन समारंभाचे आयोजन केले होते. पंतप्रधान मोदी आणि लुला दा सिल्वा यांच्यात प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा होते आहे. व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, शेती, आरोग्य आणि लोकांमधील संबंध यासह परस्पर हिताच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी वाढविण्यावर या चर्चेत लक्ष केंद्रित केले जाईल.
दोन्ही देशांमधील चर्चेनंतर अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. ही भेट भारत-ब्राझील भागीदारीच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्याची संधी असेल, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनामध्ये म्हटले आहे. मोदी आणि लुला यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर भारत आणि ब्राझीलमध्ये चार करार होण्याची अपेक्षा आहे, असे भारताचे ब्राझीलमधील राजदूत दिनेश भाटिया म्हणाले. ब्राझील दौरा संपल्यानंतर, पंतप्रधान त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यासाठी उद्या नामिबियाला पोहोचतील.





