Narendra Modi : पंतप्रधान मोदी जाणार सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सौदीचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून ते सौदी अरेबियाला जाणार आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांची सौदी अरेबियाला दिलेली ही तिसरी भेट असणार आहे. यापुर्वी २०१६ आणि २०१९ मध्ये ते सौदीला गेले होते.
सौदीचे युवराज सलमान हे सप्टेंबर २०२३ मध्ये जी-२० परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आणि भारत-सौदी धोरणात्मक भागीदारी परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी भारत भेटीवर आले होते. त्यानंतर पंतप्रधानांच्या सौदी दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. भारत आणि सौदीमधील धोरणात्मक भागीदारीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांचा हा दौरा महत्वाचा असल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले.
भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात सामाजिक-सांस्कृतिक आणि व्यापारी संपर्कांचचे दीर्घ इतिहासाचे घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. धोरणात्मक भागीदार म्हणून, दोन्ही देशांमध्ये राजकीय, संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील संबंध यासह विविध क्षेत्रांमध्ये मजबूत द्विपक्षीय संबंध आहेत,असेही परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.





