Narendra Modi : जी-7 परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी कॅनडाला दाखल

कॅलगरी : जी-7 गटाच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडामधील कनानास्कीस येथे दाखल झाले. जवळपास दशकभराच्या कालावधीमध्ये ते पहिल्यांदा कॅनडला आले आहेत. जी-७ च्या परिषदेला उपस्थित राहण्याबरोबर यानिमित्ताने विविध जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील ते या दौऱ्या दरम्यान करणार आहेत. यावेळी उर्जा सुरक्षा, तेत्रज्ञान आणि नाविन्यतेच्या मुद्द्यासह एआय-ऊर्जा संबंध आणि क्वांटम-संबंधित मुद्दयांवर ते विशेष भर देण्याची शक्यता आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
कॅनडाला येण्यापुर्वी पंतप्रधान मोदी सायप्रसच्या दौऱ्यावर होते. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून ते जी-७ गटाच्या शिखर परिषदेला उपस्थित राहिले आहेत. गेल्या वर्षी खलिस्तानी फुटिरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडादरम्यानच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. भारताने कॅनडातील आपल्या उच्चस्तरिय अधिकाऱ्यांना माघारी बोलावले होते. तसेच भारतात तैनात असलेल्या कॅनडाच्या अधिकाऱ्यांची संख्या कमी केली होती.
काही अधिकाऱ्यांची हकालपट्टी देखील भारत सरकारने केली होती. निज्जरच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे तत्कालिन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केल्यानंतर हा तणाव वाढला होता. मात्र कॅनडाचे पंतप्रधान म्हणून कार्नी यांनी सूत्रे स्वीकारल्यानंंतर भारताबरोबरचे बिघडलेले संबंध पुन्हा सुरळीत करण्याचे धोरण कॅनडा सरकारने स्वीकारले.
पंतप्रधान मोदींना जी-7 परिषदेचे निमंत्रण देणे हे या प्रयत्नांचे निदर्शक आहे. भारत हा जी-७ गटाचा सदस्य नाही. तरी पंतप्रधान मोदी यांना सहाव्यांदा या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. कॅनडातील परिषद आणि अन्य नेत्यांच्या भेटीगाठी संपवल्यानंतर पंतप्रधान क्रोएशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.





