“नरेंद्र मोदी आमचेही पंतप्रधान, मुस्लिम देशात त्यांचा अवमान झाला हे आम्हाला रुचले नाही” – इम्तियाज जलील

औरंगाबाद – भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर देशासह राज्यात आज विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. शर्मा यांना अटक करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम बांधवांकडून करण्यात येत आहे. सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर, जालना यासह विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. तर काही ठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आजच्या निदर्शनांनंतर औरंगाबाद येथे बोलताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, नुपुर शर्मा यांनी ज्या दिवशी ते वादग्रस्त वक्तव्य केले त्याच दिवशी भाजपने त्यांना पक्षातून काढायला हवे होते. त्याच वेळी तो कार्यक्रमही बंद करायला हवा होता. वाहिन्यांनी अशा वादग्रस्त विषयांवरचे कार्यक्रम दाखवूच नयेत. मुस्लिम देशांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवमानना झाली. ते आम्हांलाही रूचलेले नाही. ते आमचेही पंतप्रधान आहेत. मात्र शर्मा यांच्याबाबत काही न बोलून सरकार एकप्रकारे त्यांचे समर्थनच करते आहे. मुस्लिम देशांप्रमाणे आम्हीही बहिष्कार टाकल्यावरच कारवाई केली जाणार का, असा सवाल त्यांनी केला.





