बारामती – बारामतीकरांच्या नागरि सत्काराला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले. नरेंद्र मोदी यांनी देशाला दिशा दिली.जगभरातून भारताचे कौतुक होत आहे. भारत अंतराळात महासत्ता बनली आहे. जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. चंद्रयान मोहिमेत महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण आहे. कमी खर्चात यशस्वी मोहीम झाली.अनेक क्षेत्रात देशाने आपला ठसा उमटविला असून मोदींनी देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर नेली असल्याचे सांगत अजित पवार यांनी मोदी यांच्यावर स्तुती सुमने उधळली. राष्ट्रवादी पक्ष फुटी बाबत अजित पवार यांनी वक्तव्य करण्यास मात्र टाळले. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे नावही अजित पवार यांनी घेतले नाही. माझी भूमिका महाराष्ट्र समोर मांडणार सत्ते संदर्भात घेतलेली भूमिका मी महाराष्ट्रा समोर मांडणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखवले. मी सत्तेला हापापलेला कार्यकर्ता नाही. सत्तेचा ताम्रपट घेऊन जन्माला आलो नाही. मंत्रिमंडळात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला महिलांचाही समावेश केला. शाहू फुले आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्तेत आल्याने कामाची संधी मिळाली. राज्यात विविध योजना व प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.देवेंद्र फडणीस यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणली आहे. यापुढे राज्यात अनेक सभा घ्याव्या लागतील असे पवार म्हणाले. पुणे- नगर – रेल्वेला -गती देणार पुणे नगर नाशिक रेल्वेचे काम रेंगाळले आहे.या कामला गती देणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. वेळ पडल्यास या प्रश्नावर दिल्लीत चर्चेला जाणार असल्याचे पवार म्हणाले. रस्ते ,रेल्वे ,मेट्रो झाले तर दळणवळण वाढून कायापालट होईल असेही पवार म्हणाले.