Narendra Modi : देशातील काही राजकीय शक्ती राष्ट्रीय स्वाभिमानापेक्षा तुष्टीकरणाच्या राजकारणाला आजही प्राधान्य देत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी केली. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला ज्या मानसिकतेने विरोध केला, तीच संकुचित विचारसरणी आजही देशात कार्यरत आहे, असे त्यांनी नमूद केले. गुजरातच्या सोमनाथ येथे आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवात पंतप्रधान (Narendra Modi) बोलत होते. यावेळी त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेवर भाष्य केले. सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी मोठे प्रयत्न केले, परंतु त्यांना तत्कालीन पंतप्रधान नेहरूंच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. सोमनाथ मंदिर हे राष्ट्रीय अस्मितेच्या मुद्द्यावरही राजकारण कसे केले जाते, याचे जिवंत उदाहरण आहे, असे मोदी म्हणाले. Narendra Modi ११ मे या तारखेचे महत्त्व सांगताना पंतप्रधानांनी १९९८ च्या पोखरण अणुचाचण्यांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, जगातील कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही. परकीय आक्रमकांनी आपली सांस्कृतिक प्रतीके नष्ट केली, परंतु आपण आपला वारसा पुन्हा उभा केला. आपल्या सांस्कृतिक केंद्रांकडे झालेले दुर्लक्ष हाच प्रगतीतील मोठा अडथळा होता. आता आपण विकास आणि वारसा या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन पुढे जात आहोत, असे त्यांनी बोलताना अधोरेखित केले. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी (Narendra Modi) सोमनाथ मंदिरात महापूजा आणि धार्मिक विधी पार पाडले. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारानंतरच्या ७५ व्या वर्षानिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.