Narendra Modi : पश्चिम आशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर शांततामय मार्गाने तोडगा निघावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केली आहे. नॉर्वेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी नॉर्वे बरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांच्याशी चर्चा केली. भारत आणि नॉर्वे दोन्ही देश नियमांवर आधारीत व्यवस्था, संवाद आणि मुत्सदेगिरीवर विश्वास ठेवणारे देश आहेत. केवळ लष्करी संघर्षाच्या आधारेच सोडवता येऊ शकेल, अशी कोणतीही समस्या नाही, असे पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. युक्रेन असो, अथवा पश्चिम आशियातील संघर्ष असो. हे संघर्ष लवकरात लवकर समाप्त व्हावेत आणि शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांना आमचा पाठिंबा असेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. Narendra Modi जागतिक संस्थांमध्ये सुधारणेच्या गरजेलाही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. जागतिक पातळीवरील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक आहे, हे देखील आपण मान्य करतो आहेत, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी नॉर्वेचे आभार मानले. आपण गेल्या वर्षीच नॉर्वेला भेट देणार होतो. पण पहलगाम हल्ल्यामुळे हा दौरा लांबणीवर टाकावा लागला असेही त्यांनी सांगितले. भारताच्या नेतृत्वाखालील इंडो-पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्हमध्ये सामील होण्याच्या नॉर्वेच्या निर्णयाचे मोदींनी (Narendra Modi) कौतुकही केले. दोन प्रमुख सागरी राष्ट्रे म्हणून, आम्ही सागरी अर्थव्यवस्था, सागरी सुरक्षा आणि क्षमता बांधणी या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करू, असे ते म्हणाले.