Narendra Mehta : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या पक्षातील एका आमदाराविरोधात कारवाईचे निर्देश दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता हे गंभीर आरोपांमुळे अडचणीत आले असून पंतप्रधान कार्यालयाने (PMO) या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाला कारवाईचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. नरेंद्र मेहता यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा, तसेच आदिवासींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ते ‘सेव्हन इलेव्हन’ कंपनीचे मालक असून या कंपनीमार्फत जमिनींचे गैरव्यवहार केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. मिरा रोड परिसरातील कांदळवन क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करून क्लबचे बांधकाम केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने यापूर्वीच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आता या प्रकरणाला आर्थिक घोटाळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून, मेहता यांनी शेतकरी व आदिवासींच्या जमिनी कमी किमतीत खरेदी करून सुमारे 400 ते 500 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप आहे. तसेच ‘अपना घर’ प्रकल्पात 79 कोटींचा वाळू रॉयल्टी घोटाळा आणि मेट्रो उड्डाणपूल प्रकल्पाची किंमत 217 कोटींवरून 620 कोटींपर्यंत वाढवण्याच्या प्रकरणाचीही चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कथित पत्रात मेहता यांचा उल्लेख ‘भूमाफिया’ असा केल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा मुद्दा उचलून धरत मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, नरेंद्र मेहता यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, “राजकीय द्वेषातून हे आरोप केले जात आहेत,” असा दावा केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मिरा-भाईंदरसह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.