Narayangaon News : नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत व रेकॉर्डवरील आरोपी मोन्टु छोटेलाल सिंग (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यास कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. (Narayangaon News) सदर आरोपीविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी करणे, दुखापत, जबरी चोरी, दहशत निर्माण करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे आदी गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करून नागरिकांना धमकावले जात असल्याबाबत पोलिसांकडे वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. (Narayangaon News) आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याच्या वर्तणुकीत कोणताही बदल न झाल्याने पोलिसांनी त्याच्या हालचाली व गुन्हेगारी प्रवृत्तीचा अहवाल तयार करून उपविभागीय दंडाधिकारी, मंचर यांच्याकडे तडीपार प्रस्ताव सादर केला होता. (Narayangaon News) त्या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी यांनी आरोपीस पुणे जिल्ह्यातून एक वर्ष कालावधीसाठी तडीपार करण्याचे आदेश पारित केले. त्यानुसार आरोपीस अहमदनगर जिल्ह्यात सोडण्यात आले असून पुणे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश न करण्याची ताकीद देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. (Narayangaon News) ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे महादेव शेलार आणि पोलीस कॉन्स्टेबल सुभाष थोरात यांनी पार पाडली. (Narayangaon News)