प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – केळीच्या बागेतून जास्तीत जास्त आणि निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सातसुत्री पद्धतीचा अवलंब करावा, असे प्रतिपादन पोलन ॲग्रो मिनरल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सागर कोपार्डेकर यांनी केले. ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे आयोजित ‘ग्लोबल कृषी महोत्सव २०२६’ मधील पीक परिसंवादात ‘निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर ते बोलत होते. डॉ. कोपार्डेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, केळीची लागवड ७ बाय ५ फूट अंतरावर गादीवाफ्यांवर करावी. लागवडीसाठी नामांकित कंपनीची उतीसंवर्धित रोपे वापरून ठिबक सिंचनाचे योग्य नियोजन करावे. तसेच बंच केअरमध्ये इंजेक्शन देणे, स्कर्टिंग बॅग वापरणे, वाळलेली पाने-फुले काढणे यांसारखी कामे वेळेवर पूर्ण करावीत. सध्याच्या कमी तापमानामुळे केळीवर येणाऱ्या ‘चिलिंग’ समस्येवर उपाय म्हणून लाल शैवालयुक्त औषध, गुळाचे द्रावण आणि चिलेटेड कॅल्शियमची फवारणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. केळी पिकात सातत्य राखल्यास या भागात निर्यातदारांची संख्या वाढून शेतकऱ्यांना अधिक बाजारभाव मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विषयतज्ज्ञ भरत टेमकर यांनी सांगितले की, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील हवामान केळीसाठी पूरक असून गल्फ आणि सार्क देशांमध्ये येथील केळीला मोठी मागणी आहे. या कार्यक्रमाला कृषिरत्न अनिल मेहेर, विनायक मुळे, ऋजित मेहेर, देविदास भुजबळ, अल्हाद खैरे, निलेश पाटे, देवेंद्र बनकर यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.