प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – शेतकऱ्यांनी केवळ शेतमालाचे उत्पादन करण्यावर भर न देता विक्रीपर्यंतची मूल्यवर्धन साखळी समजून घेतली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याच्या कृषी विभागाचे माजी मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी केले. नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित ‘ग्लोबल कृषी महोत्सव २०२६’च्या समारोप प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, अकोला कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायंदे, माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, फलोत्पादन संचालक डॉ. सुदाम अडसूळ, कृषिरत्न अनिल मेहेर, पूजा बुट्टे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. गोयल यांनी हवामानाचा लहरीपणा आणि बाजारभावाचा विचार करून नियोजन करण्याचे आवाहन केले. डॉ. राजाराम देशमुख यांनी या प्रदर्शनाची तुलना बारामती येथील प्रदर्शनाशी करत, कृषी विज्ञान केंद्राने नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तांत्रिक मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमात शेतीतील माती आणि पाण्याचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात आला. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवल्यास मानवी आरोग्य सुरक्षित राहील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. वैज्ञानिक आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून संघटितपणे शेती केल्यास ती निश्चितच फायदेशीर ठरेल, असा सूर या महोत्सवात उमटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील ढवळे, मेहबूब काझी तर रवींद्र पारगावकर यांनी आभार मानले. “ग्रामोन्नती मंडळाने आयोजित केलेल्या ग्लोबल कृषी महोत्सव २०२६ प्रदर्शनास चार दिवसांत एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली. दरवर्षी ही संख्या वाढत असून, भविष्यात नवनवीन तंत्रज्ञान आणि सूचनांचा अंतर्भाव करून प्रदर्शन अधिक व्यापक केले जाईल.” – कृषिरत्न अनिल मेहेर