प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – येथील बसस्थानक परिसरात तीन संशयित आरोपींना तीन गावठी पिस्तुल, नऊ जिवंत काडतूस आणि मोटारसायकलसह एकूण १ लाख ७५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह दहशतवाद विरोधी शाखा (एटीएस) आणि पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पथकाने गुरुवारी (दि. ३०) जेरबंद केले आहे.दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल ओंकार शिंदे आणि मोसीन शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नारायणगाव बसस्थानक परिसरात एका स्प्लेंडर मोटारसायकलवर तीन संशयित व्यक्ती फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी स्थानिक गुन्हा शाखेला माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महोदव शेलार, प्रविण सपांगे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने सापळा रचून धनंजय चक्रधर साळुंखे, सुरज आप्पासाहेब कडीले आणि अनमोल दादाभाऊ जाधव या तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत तीन गावठी पिस्तुल, नऊ जिवंत काडतूस आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना दि. ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला होता. पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.