प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – येथील कोल्हे मळा परिसरातील ओंकार समृद्धी सोसायटीत वास्तव्यास असलेल्या सीमा शरद शिंदे यांच्या फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी १ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरूवारी (दि. ४) पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी सोसायटीतील अजहर काझी आणि सुविधा सोसायटीतील प्रमोद बाबर यांच्या बंद घरातही चोरी झाली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली आहे.सीमा शिंदे दत्त जयंतीनिमित्त नातेवाईकांकडे गेल्या असताना चोरट्यांनी फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील लॉकरमधून ९० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र (साडेतीन तोळे), ३० हजारांचे कानातील वेल, ११ हजारांचे चांदीचे मंगळसूत्र व पैंजन आणि रोख ४० हजार रुपये असा एकूण १ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.