नारायणगाव : नारायणगाव बसस्थानक परिसर ते मुख्य बाजारपेठ मार्गे पश्चिम वेशीपर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. व्यवसायिकांनी विक्रीसाठी साहित्य फुटपाथ तसेच मुख्य रस्त्यावर मांडल्यामुळे वाहतूक आणि पादचार्यांची रहदारी धोकादायक बनली आहे. नारायणगावची शान मानली जाणारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेली पूर्व वेसही अतिक्रमणामुळे झाकोळली गेली आहे. भाजीपाला, फळ व पूजा साहित्य विक्रेत्यांनी पूर्व वेशीचा परिसर व्यापल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत असून ऐतिहासिक वास्तूची शोभा कमी होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. पूर्व वेशीपासून पश्चिम वेशीपर्यंत अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत कार्यालय परिसरातही विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीची कोंडी वारंवार होत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गावांतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले असले तरी काही कामे अद्याप अपूर्ण असल्याने नागरिक व व्यापार्यांना अडचणी निर्माण होत आहेत. पोलीस प्रशासनाची कारवाई सुरू नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण धारकांना गुरुवारपर्यंत (दि. 21) अतिक्रमण स्वखर्चाने हटविण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांना लेखी नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह नारायणगाव शहरातील मुख्य रस्ता अतिक्रमणामुळे संकुचित होत असतानाही स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मतांच्या राजकारणामुळे अतिक्रमण वाढत असल्याचा आरोपही नागरिकांतून केला जात आहे. प्रशासनाने ठोस भूमिका घेत हितसंबंध बाजूला ठेवून अतिक्रमण हटविल्यास नारायणगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतुकीसाठी सुकर होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. हेही वाचा : Pune District : महिला-बालकल्याण योजना अंमलबजावणीला नवी दिशा! अदिती तटकरे-अंकिता पाटील ठाकरे यांची मंत्रालयात चर्चा